गझलकार अनिल कांबळे यांच्या
एका गझलेचा मतला मला खूप
आवडतो. *खरे तर, दार वा-याने
जरासे वाजले होते कितीदा तूच
आल्याचे मनाला वाटले होते...*
...खरं तर वा-यानेच दार वाजलं
होतं, वाजत होतं पण तूच आलीस
असं प्रत्येकवेळेला वाटत
होतं. हं...तू येणार नाहीस हे
मला पक्कं ठाउक आहे पण माझं
वेडं मन तुझीच वाट पाहात असतं
आणि याची कबुली ते कळत-नकळत
देतही असतं.. हा शेर जेव्हा
प्रथम वाचनात आला तेव्हा मला
उर्दू गझलांच्या वातावरणात
गेल्यासारखे वाटले. शायराचं
घरी एकटं असणं आणि त्याने
केलेल्या त्या एकटेपणाच्या
काळाचं चित्रण उर्दू
शेरांमधून वाचलं होतं.
त्यावेळी मराठी गझल नुकताच
लिहू लागलो होतो आणि मराठी
गझलांपेक्षा तेव्हा उर्दू
गझलांचं वाचन अंमळ जास्तच
झालं होतं. या पार्श्वभूमीवर
हा मतला मला फारच भावून गेला.
अतिशय साधे शब्द घेऊन हा मतला
उतरलेला आहे. दार वाजत आहे पण
जरासंच. वा-याचा
कापसापेक्षाही हलकाच झोत आहे
तो. एखाद्याची चाहूल लागताना
हवेची जितकी हालचाल होते,
तितकीच हालचाल आहे. अशी हालचाल
आहे म्हणूनच कविमनाची
कुणीतरी आपलं आल्याची भावना
प्रबळ होते, दिलासा मिळतो.
महाराष्ट्रातील किंवा
भारतातील म्हणू या, दुपारचं
वातावरण हे असंच असतं. सकाळची
कामं धामं आटपलेली असतात आणि
दारं हलकीच लावून माणसं
वामकुक्षी घेत असतात.
तितक्यात, दार हलतं आणि कुणी
आलं आहे की काय, याचा कानोसा
घेतला जातो. एक उर्दू शेर
स्मरतो.. कौन आया है यहाँ, कोई न
आया होगा मेरा दरवाजा हवाओंने
हिलाया होगा या शेरात शायर सरळ
मान्य करत आहे - माझ्या घरी,
माझ्यासारख्या भणंगाच्या घरी
कोण येणार आहे? कोणीच येणार
नाही. मला माहीत आहे, कोणीच
येणार नाही. माझा दरवाजा जो
हलतोय तो हवेमुळं, कुणाच्या
येण्यानं नाही. कुणी दारावर
थाप दिली म्हणून नाही. मराठी
शेरात मनातील आशा जिवंत आहे.
उर्दू शायरही आशावादी आहे पण
भाबडा आशावाद धरून
ठेवण्यापेक्षा त्यानं कठोर
वास्तवाचा स्वीकार केला आहे
आणि यातच शहाणपण आहे, हे तो
अप्रत्यक्षपणे ध्वनित करत
आहे. दोन्ही शेर स्वतंत्रपणे
सुंदर आहेत. त्यांचा आस्वाद
स्वतंत्रपणे घेणंच श्रेयस्कर
आहे. कांबळेंचा शेर किंचित
अधिक आवडण्यासारखा असावा.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2151
Wednesday, June 9, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment