मित्रांनो, शे(अ)रो-शायरी ह्या
लेखमालेच्या ११ व्या भागात जी
गझल मी आपल्यासोबत शेअर करतोय,
तिची दोन खास वैशिष्ठ्ये मला
जाणवलीत! पहिले म्हणजे 'और हो
गयी' म्हणजे 'एकदम बदलून गेली'
ह्या भावार्थाने आलेले, आणि
आशय व्यक्त करण्याच्या
अनेकविध शक्यतांना वाव
देणारे हे रदीफ. आणि दुसरे
म्हणजे मराठीतील
'लगालगालगालगा...' अश्या
वृत्ताशी अतिशय साधर्म्य
असलेली ह्या गझलेच्या
वृत्ताची लय! ..गझल परवीन
शाकिरची आहे... अगदी आशय-संपन्न
अशी! मतला असा आहे की- *सभी
गुनाह धुल गए सज़ा ही और हो गई
मेरे वजूद पर तेरी गवाही और हो
गई* [ १) वजूद=अस्तित्व ] ह्या
शेराचा आशय, मला वाटते, जरासा
abstract आहे, आणि तो 'वजूद पर
गवाही' ह्या शब्दांभोवती
फिरतो. माझ्या मते ही परवीनने
कमालीच्या पुरूष-प्रधान
संस्कृतीवर केलेली टिप्पणी
आहे. अश्या पुरूष-सापेक्ष जगात
स्त्रीचे अस्तित्व आणि
त्याच्याशी निगडीत असलेल्या
तिच्या इच्छा, आशा, आकांक्षा
ह्याच एक गुन्हा ठरतात. नुसती
इच्छा व्यक्त केली तरी सुद्धा
तिला शिक्षा मिळू शकते
किंबहुना मिळते, हे रोज आपल्या
नजरेस पडणारे एक जळजळीत
वास्तव आहे. आणि ही
पुरुष-सापेक्षता इतकी
पराकोटीची आहे, की स्त्रीच्या
इच्छा-आकांक्षांना अस्तित्व
वा मान्यता असावी किंवा नाही
हे फक्त आणि फक्त पुरुषच ठरवित
असतो. ( चांगल्या पगाराची
नोकरी करणाऱ्या स्त्रीला एक
साधा कुकींगचा क्लास लावायचा
असेल तर आधी नवऱ्याची परवानगी
घ्यावी लागते हे मी प्रत्यक्ष
बघितलेले उदाहरण आहे.).... तिचे
existence त्याने endorse केले तर ठीक,
नाही तर तो एक गुन्हाच ठरतो.
असेही म्हणू शकतो की,
स्त्रीवर'आजन्म चालणाऱ्या
ह्या खटल्याचा निकाल'
संपूर्णपणे पुरुषाच्या
साक्षीवर अवलंबून असतो.
त्याची साक्ष, किंबहुना एकमेव
त्याचीच साक्ष स्त्रीच्या favour
मधे असेल तरच स्त्रीच्या
अस्तित्वाला मान्यता मिळते,
अन्यथा ती एक अपराधीच
ठरविल्या जाते. कारण हा खटलाच
पुरुषाने दाखल केलाय. म्हणून
ह्या शेरात परवीन, पुरुष
जातीला उद्देशून, कदाचित
उपरोधिकपणे सुद्धा, असे म्हणत
असावी की आधी तर तुला माझ्या
भावनांचे अस्तित्व मान्य
नव्हते, पण आता, कसा कुणास ठाऊक,
तुझा माझ्या
अस्तित्वाबद्दलचा दृष्टीकोन
एकदम बदलून सकारात्मक झालाय(
वजूद पर गवाही और हो गयी),
त्यामुळे 'आरोपीच्या
पिंजऱ्यातून' आता माझी
मुक्तता होतेय..! पुरुष-प्रधान
व्यवस्थेत स्त्रीच्या
भाव-भावनांना, हळूऱ्हळू का
होईना, आता मान्यता मिळायला
लागलीय असेही कवियत्रीला
सुचवायचे असावे.
*रफुगरान-ए-शहर भी कमाल लोग थे
मगर सितारा साज़ हाथ में क़बा
ही और हो गई* [ १) रफुगर=रफु
करणारा कारागीर, २) सितारा
साज़= दुपट्ट्यावर सितारा,
चमकी, किरण अशी कलाकुसर करणारा
कारागीर, ३) क़बा=अंगरखा,झगा ]
ह्या शेराचा शब्दार्थ बघितला
तर असा लागेल की शहरात रफु
करणारे एकाहून एक असे निष्णात
कारागीर होते पण ओढणीवर
कलाकुसर करणाऱ्या
कारागीराच्या हातून अंगरखा
काही वेगळीच चीज बनून
आला...ह्या शेराबद्दल मी
कवितकोश ह्या वेबसाईटचे
संचालक श्री. ललित कुमारजी
ह्यांच्याशी चर्चा केली होती,
आणि त्यातून ह्या शेराचा एक
खूप छान भावार्थ समोर आला जो
मी इथे देतोय...असे बघा की रफु
हा बेमालूमपणे करावा लागतो;
त्यालाही कौशल्य हे लागतेच, पण
त्याच्यात कलात्मकता तशी
म्हणाल तर नाही, पण परफेक्शन
मात्र असावे लागते. ओढणीवर
कलाकुसर करण्याचे काम हे
खऱ्या अर्थाने
क्रिएटीव्हीटीचा कस लावणारे
आहे. ... एक साधारण दर्जाचा
कलाकार आणि खरा प्रतिभाशाली
कलाकार (अथवा बेमालूमपणे
काव्य 'प्रसवणारा' कवि आणि
खराखुरा प्रतिभावंत कवि)
ह्यांच्यात काय फरक आहे
ह्यावर हा शेर अतिशय मार्मिक
भाष्य करतो.उच्च दर्जाचे
सौंदर्य असलेली कलाकृती एका
प्रतिभावंत कारागीराच्या
हातूनच निर्माण होऊ शकते, हेच
खरे! *अँधेरे में थे जब तलक
ज़माना साज़गार था चिराग क्या
जला दिया हवा ही और हो गई* [ १)
साज़गार=अनुकूल, योग्य,
कल्याणप्रद ] शायरा म्हणतेय की
ह्या जगातील लोक मोठे मतलबी
आहेत. प्रगतीचे, ज्ञानाचे सगळे
फायदे फक्त त्यांनाच लाटायचे
आहेत. त्यांना त्यांच्या
विकासात, प्रगतीत कुणीही
वाटेकरी, अथवा प्रतिस्पर्धी
नकोय. आणि त्यामुळेच की काय, मी
कायमच अज्ञानाच्या अंध:कारात
खितपत रहावे, माझी कधीच प्रगती
होऊ नये असे्च त्यांना वाटते.
जो पर्यंत स्वत:च्या हक्काची
जाणीव नसलेल्या एखाद्या
खुळ्या सारखी मी जगत होते, तो
पर्यंत दुनिया खुश होती, माझी
पाठराखण करीत होती. पण मी जरा
कुठे ज्ञानाच्या, प्रगतीच्या
रस्त्यावरून वाटचाल सुरू
केली, तर जगाच्या पोटात
दुखायला लागलेय...जे जग आधी मला
अनुकूल होते, त्याच्या
वागणूकीचा नूरच अचानक पालटून
गेला... तेच जग आता माझ्या
प्रगतीच्या रस्त्यात अडथळे
निर्माण करु बघतेय..माझी
'ज्ञानज्योत' विझवायला
निघालेय... आजूबाजूच्या जगात
किती दांभिकता भरलीय, हेच
कवियत्री ह्या शेरात सांगू
बघतेय. *बहुत संभल के चलने वाली
थी पर अब के बार तो वो गुल खिले
कि शोख़ी-ए-सबा ही और हो गई* [१)
शोखी=धीटपणा, खोडसाळपणा २)
सबा=हवा ] ह्या शेरातील
भावार्थ अत्यंत मार्मिक असा
आहे. शायरा म्हणतेय की हवा
नेहमी फुलांच्या अवती-भवती
खेळत असते,.. फुलांचे सौंदर्य
तिला भुरळ घालत असते,..मोहात
पाडत असते!...हवा अधून-मधून
फुलांशी खट्याळपणा करते
देखील, पण स्वत:ची आणि फुलांची
मर्यादा संभाळून! फुलांच्या
सौंदर्याने मोहवश होऊन
आपल्या हातून एखादी
लक्ष्मणरेषा तर ओलांडल्या
जाणार नाही ना, ह्याची ती
नेहमी खबरदारी घेत असते. पण
ह्या ऋतूत मात्र काहीतरी
वेगळेच घडलय! ह्या खेपेला
फुलांवर, मनाला झपाटून,
वेडावून टाकणारा असा काही
धुंद बहर आलाय की हवेची
खट्याळपणा करण्याची तऱ्हाच
एकदम बदलून गेली. ती आता
निरागस राहिली नसून, तिच्यात
विकारांचे प्रतिबिंब असलेली
एक प्रकारची धॄष्टता झालीय.
ज्या हवेने आतपर्यंत स्वत:ला
संयमाच्या, विवेकाच्या
बंधनाने बांधून ठेवले होते, ती
बंधने आता फुलांच्या
सौंदर्याने मोहवश होऊन सैल
पडू लागली आहेत. (हवा अब बहक सी
गयी है!)....मोहापासून स्वत:ला
वाचविणे किती कठीण आहे हे
मोठ्या खुबीने ह्या शेरात
सांगण्यात आलेय... ( हा शेर
वाचल्यावर मला 'पिंजरा'
चित्रपटातील नायकीणीच्या
मोहात पडलेल्या मास्तरांची
कथा आठवली. ) *न जाने दुश्मनों
की कौन बात याद आ गई लबों तक
आते-आते बद्दुआ ही और हो गई* [ १)
बद्दुआ=शापवाणी ] असे म्हणतात
की कुणालाही शिव्या-शाप देऊ
नये, आणि हाच नेक विचार ह्या
शेरात व्यक्त झालाय. शायरा
म्हणते की माझा जो शत्रू आहे,
ज्याने मला अनन्वित छळले,
मानसिक यातना दिल्या,
त्याच्या नावाने मी
शापवाणीचा उच्चार करणारच
होती, पण अचानक त्याच्या
बाबतीतल्या कुठल्यातरी
गोष्टीचे मला अचानक स्मरण
झाले, आणि माझी शापवाणी ओठावर
येईपर्यंत एकदम बदलूनच
गेली...ती शापवाणीच राहिली
नाही. ह्या शेराची खुबी म्हणजे
'दुश्मनो की कौन बात' मधे
दिसणाऱ्या अर्थाचे बहुविध
पदर!... जसे १) शत्रूचा एखादा
सदगुण, किंवा नेकी! प्रत्येक
व्यक्तीत काहीना काही नेकी
असतेच ,म्हणून त्याचेच काय,
कुणाचेही वाईट चिंतणे योग्य
नाही. २) आपल्याच सारखी त्याला
असलेले मुले-बाळे, आप्तेष्ट!
आपल्या शापवाणीने त्याचे
वाईट झाले तर त्याच्या
आप्तेष्टांनाही तसेच व
तितकेच दु:ख होईल, जितके
आपल्या आप्तेष्टांना आपले
वाईट झाल्यावर झाले असते,
म्हणून त्याला शिव्या-शाप देऊ
नयेत.३) शत्रूच्या स्वभावातील,
व्यक्तीमत्वातील एखादे
कमालीचे वैगुण्य, किंवा दोष,
ज्यामुळे त्याची करुणा येऊन
आपण असा विचार करायला लागू की,..
जाऊ द्या, अश्या आधीच विकारवश
असलेल्या व्यक्तीचे काय वाईट
चिंतायचे म्हणजे ..मरे हुवे को
क्या मारना! *ज़रा सी कर्गसों
को आब-ओ-दाना की जो शह मिली
उक़ाब से ख़िताब की अदा ही और
हो गई* [ १) कर्गस=गिधाड, २)
आब-ओ-दाना= दाणा-पाणी ३)
शह=उत्तेजन, मदत ४) उक़ाब= गरुड
५) ख़िताब = संभाषण, (इथे 'पदवी'
ह्या प्रचलित अर्थाने न येता
ख़िताबच्या दुसऱ्या अर्थाने
आलाय) ] गर्वाने फुगून जाऊन
बैलाएवढे होऊ बघणाऱ्या
बेडकाची गोष्ट सर्वांनाच
माहिती आहे. थोडाफार तसाच आशय
ह्या शेरात आहे. ...गिधाडे,
ज्यांची गुजराण कशी होते हे
साऱ्या जगाला माहिती आहे,...
अश्या गिधाडांना जरा चांगले
दाणा-पाणी काय लाभले, तर
त्यांची गरुडांशी संभाषण
करण्याची तऱ्हाच बदलून गेली!
ते आता स्वत:ला
गरुडांपेक्षाही श्रेष्ठ
समजायला लागले... ह्या शेरावर
अधिक काय बोलावे?...जरा कुठे
सन्मान, सत्कार, किंवा स्तुती
झाली, तरी आपली खरी-खुरी लायकी
विसरून, एकदम शेफारून
जाण्याची प्रवृत्ती आपल्या
आजूबाजूला आपल्याला सर्वच
क्षेत्रात दिसते (..कौआ चले हंस
की चाल! ) आता आपला निरोप घेतो.
पुढील भागात भेटूच ! -मानस६
(जयंत खानझोडे)
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment