"पहा ग़ालिब काय म्हणतो," असे
म्हणत समीक्षकसाहेबांनी हा
शेर ऐकवला -- /*बक़द्रे शौक़़
नहीं ज़र्फ़े-तंगनाए-ग़ज़ल
कुछ और चाहिए वुस्अत मेरे
बयाँ के लिए*/ (गझलेचे मैदान
लहान पडते आहे. मला थोडी मोठी
जागा हवी.
समीक्षकसाहेबांच्या मते
आकृतिबंधाच्या नियमांमुळे
एक्स्प्रेशनवर मर्यादा पडतात
ह्याची जाणीव ग़ालिबने ह्या
शेरामध्ये व्यक्त केली आहे.
परिसंवाद संपल्यावर मी
त्यांना ह्या ओळीची
पार्श्वभूमी थोडक्यात
सांगितली आणि हा शेर कसा
इंटरप्रिट करायला हवा ह्याची
कल्पना दिली. माझ्यापुरता हा
विषय तिथे संपला. पुढे काही
दिवसांनी हाच शेर मी मराठी
गझलविषयक एका पुस्तकात
पाहिला (सुरेश
भटांच्यानंतरची गझल...)
ह्यातही हा शेर एक दाखला
म्हणून उद्धृत केला आहे, असं
मला दिसलं. हा शेर भलताच
'कामाचा' वाटल्याने
समीक्षकांना ह्या शेराने
चांगली भुरळ घातली आहे हे
माझ्या ध्यानात आलं.
वस्तुस्थिती अशी आहे की
समीक्षात्मक लिखाणामध्ये
उद्धृत करावा असे ह्या
शेरामध्ये काहीही नाही.
संदर्भ ध्यानात न घेतल्याने
दोघाही समीक्षकांची गल्लत
झालेली आहे. ह्याउप्पर
ग़ालिबच असे म्हणतो असे सांगत
हा शेर मराठी वाचकांपुढे
ठेवला आहे. दीवाने ग़ालिबच्या
शेवटच्या गझलेमध्ये ह्या ओळी
आहेत. ही एक वैशिष्ट्यपूर्ण
गझल आहे. एक प्रयोग म्हणून
कवीने ह्या गझलेमध्ये एक
स्तुतिपर कविता समाविष्ट
केली आहे. ह्या कवितेची
सुरुवात उपर्युक्त ओळींनी
होते. कसीद्यामधील ज्या भागात
स्तुती केलेली असते दत्या
भागाला 'मिदह' असे म्हणतात. हा
भाग ह्या गझलेमध्ये समाविष्ट
केला आहे. आणि असे करताना ही
सलग रचना आहे, एक ब्लॉक आहे,
क़ता आहे, ह्याचा निर्देश
क़ाफ़ ह्या मुळाक्षराने केला
आहे. ह्यामुळे वरील ओळींचा
अर्थ समजून घेण्याकरिता
पुढचामागचा संदर्भ लक्षात
घेणे आवश्यक होऊन बसते.
उपर्युक्त ओळींच्या आधारे
कवी गझलेकडून कसीद्याकडे
वळतो आहे. असे करत असताना कवी
म्हणतो की मला आपलं म्हणणं
मांडण्यासाठी म्हणजेच स्तुती
करण्यासाठी, दोन ओळी पुऱ्या
पडणार नाहीत. मला भरभरून
स्तुती करायची आहे आणि
त्यासाठी विस्ताराची गरज आहे.
उपर्युक्त दोन ओळींचा अर्थ
असा आहे. संक्षेप/संक्षिप्तता
(Compactness) ही जशी गझलेतील शेराची
खासियत आहे तशी विस्तार ही
कसीद्याची खासियत आहे. 'तंगनाए
ग़ज़ल' मध्ये गझलेचा
कॉम्पॅक्टनेस अभिप्रेत आहे
आणि 'वुस्अत' मध्ये कसीद्याचा
विस्तार अभिप्रेत आहे. 1 हा शेर
म्हणजे गझलेवरचं भाष्य,
अनुभूतीचा उद्गार, अनुभवाचे
बोल असलं काही नव्हे. मी
उर्दूमधील ह्या ओळींवर
लिहिलेल्या 4-5 कॉमेंटरीज़
पाहिल्या. सगळेच भाष्यकार 3-4
ओळींत अर्थ सांगून पुढे
गेलेले आहेत. कारण उघड आहे.
काही विशेष दिसले नाही म्हणून.
मराठी गझल समीक्षकांनी मात्र
ह्या शेरातले पोटेन्शिअल
बरोबर हेरले आणि
रदीफ़-क़ाफ़िया ने
मेटाकुटीला आलेल्या कवींना
मोठा आधार मिळाला.
------------------------------------------------------------------------------
1 वुस्अते बयान हा कसीद्याच्या
संदर्भात वापरला जाणारा शब्द
आहे. त्याचा इथे खुबीने उपयोग
केला आहे.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2736
Tuesday, March 13, 2012
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment