विसरणेही तुझ्या लक्षात नाही
मना, सुटका तुझी इतक्यात नाही
तुझा मजकूर तर केव्हाच कळला
भलेही तो तुझ्या पत्रात नाही
जवळ येणे तुला जमलेच केव्हा?
विलगणे अन् तुझ्या हातात नाही
नको ती ओढ स्वप्नांची जराही
खरे आयुष्य हे स्वप्नात नाही
मना, तू चल, पुकारे चांदणे बघ!
तुझे कोणीच या गावात नाही
तुझीही वेगळी आहे कहाणी हवे जे
तुज, तुझ्या नशिबात नाही
तुम्ही जो पाहता तो मोकळा मी
खरा मी कैद! - पण माझ्यात नाही -
नचिकेत जोशी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2653
Monday, May 23, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment