Wednesday, April 14, 2010

हरफनमौला सुरेश : विश्वस्त

गाण्याचा गळा व गाण्यात रुची
या गोष्टी सुरेशमध्ये आहेत; हे
आमच्या आईच्या (ती. कै.
शांताबाई भट) ध्यानात आले.
म्हणून सुरेशच्या गाण्यातील
रुची वाढावी, काही माहिती
व्हावी यासाठी तिने एक बाजाची
पेटी (विश्वास कंपनी, कोलकाता)
आणली आणि त्याला संगीताची
मुळाक्षरे व बाराखडी शिकविणे
सुरू केले. आमची आई ही स्वत:
चांगली पेटी वाजवायची व तिला
संगीताची जाण होती. पुढे काही
वर्षांनंतर सुरेशला पद्धतशीर
गाणे शिकविण्यासाठी
प्रल्हादबुआ नावाचे संगीत
शिक्षक आमच्या घरी येत असत.
त्याची गाण्याची आवड व प्रगती
पाहून आमच्या वडिलांनी (ती. कै.
डॉ. श्री. रं. भट) एच. एम. व्ही.चा
एक ग्रामोफोन (चावीवाला) आणला
होता. ते सुरेशसाठी दर
आठवडय़ातून एक रेकॉर्ड विकत
आणत. आमच्या वडिलांना चांगले
संगीत ऐकण्याचा नाद होता.
त्यामुळे सुरेशला संगीतात
आवड निर्माण झाली. पुढे तो एका
बॅण्डपथकामध्ये काही दिवस
होता आणि तेथेच तो बासरी
वाजविणे शिकला. तो आजारी
पडायचा तेव्हा अंथरुणावर
असताना तो तासन्-तास बासरी
वाजवित असे. साधारणत: १९५२
च्या सुमारास त्याला तबला
शिकावा असे वाटले. म्हणून
अमरावती येथील प्रसिद्ध तबला
शिक्षक उस्ताद लड्डूमियाँ
(महरूम) यांच्याकडे काही महिने
तबला शिकला. पुढे त्याला ढोलक
वाजविण्यात विशेष रुची वाटली.
तो तासनं-तास ढोलक वाजवायचा.
आमचे काका (दिवंगत य. वा. भट) हे
संगीताचे चांगले जाणकार होते.
त्याच्याकडे हिंदुस्थानी
शास्त्रीय संगीतावर, संगीत
विद्वान भातखंडेकृत ग्रंथाचे
सर्व खंड होते. या सर्वाचे
अध्ययन सुरेशने केले होते.
दिवंगत पु. ल. देशपांडेंनी
अत्यंत आदराने ज्यांचा
उल्लेख 'गानसोपान' असा केला
होता, त्या प. पू. गुलाबराव
महाराज यांच्या ग्रंथाची
सुरेशने पारायणे केली होती.
सुरेशला व्यायामाची आवड होती.
तो दंड-बैठका काढायचा.
डबलबारवरती १०० ते १५० डिप्स
मारावयाचा व या व्यायामामुळे
त्याचा दम वाढला, त्याचा उपयोग
त्याला पुढे काव्य गायनासाठी
झाला. आमचे काका जे संगीताचे
जाणकार होते. व्हॉयोलीन उत्तम
वाजवित असत. त्यांनी पंडित
ओंकारनाथ ठाकूरसारख्या
गायकांना साथ केली होती.
त्यांची संगीत क्षेत्रातील
अनेक थोरांशी घसट होती. ते
म्हणत असत, की सुरेश हा
राष्ट्रीय पातळीवरचा गायक
झाला असता. काकांनी पुतण्याचे
केलेले हे कौतुक होते असे
मानले गेले; पण पुढे
अमरावतीच्या एच. व्ही. पी.
एम.च्या प्रांगणामध्ये संगीत
विद्वान हृदयनाथ मंगेशकर
यांचा कार्यक्रम २०
फेब्रुवारी १९८४ ला झाला. हा
कार्यक्रम होता कवीचे शब्द व
संगीतकाराचे स्वर या
कार्यक्रमामध्ये सुरेश
त्याचे गीत गात असताना
मंगेशकरांनी उत्स्फूर्तपणे
पेटी ओढून सहज साथ द्यायला
सुरुवात केली. सुरेशच्या
कविता गायन थांबल्यानंतर
मंगेशकर म्हणाले, की 'भटसाहेब,
इतक्या चांगल्या आवाजात,
तालात व सुरात गातात, हे मला
माहीत नव्हते. नाही तर मी
त्यांना सुरुवातीपासून
साथ-संगत केली असती!' 'सा रे ग म
प' या मागच्या वर्षी
प्रक्षेपित झालेल्या
कार्यक्रमाचे एक परीक्षक
हृदयनाथ मंगेशकर होते.
त्यांनी या कार्यक्रमात
त्यांनी सुरेशबद्दलची एक खरी
आठवण सांगितली. सुरेश
त्याच्या कविताचे, गीतांचे
गजलांचे तालासुरात गायन
करावयाचा त्यामुळे त्यांना
वेगळी चाल देणे अवघड होत असे.
म्हणून सुरेशच्या काव्याचे
ते प्रथम वाचन करावयाचे व त्या
अनुषंगाने ते सुरेशशी भरपूर
चर्चा करीत असत, मगच त्या
काव्यास ते अत्यंत अनुरूप असे
संगीत देत असत. सुरेशला
आकाशदिवा, पतंग, कॅलिडोक्सोप,
पेरिस्कोप उत्तम प्रकारे
बनविता येत असत. हा साधारणत:
१९५० च्या आसपासचा काळ होता.
आकाश दिव्यासाठी तो बासाच्या,
बांबूच्या कमच्या तयार करीत
असे. कॅलिडोक्सोपसाठी
उद्बत्त्यांच्या पुठ्ठय़ाचा
नळा वापरला जात असे. साधारणत:
५०-५० वर्षांपूर्वी १००
उद्बत्त्यांचा एक साधारणत:
दीड इंच व्यासाचा एक फूट
लांबीचा नळा यावयाचा. या
नळ्याचे झाकण व बुड पातळ
पत्र्याचे असे. ते काढून
टाकल्यावर एक पुठ्ठय़ाचा,
अंदाजे एक फूट लांबीचा नळाच
तयार होत असे. अमरावतीमध्ये,
एक नूर मुहम्मद नावाचा
पतंगवाला होता. सुरेश
सुरुवातीस त्याच्याकडून पतंग
विकत घेत असे. तो कसा पतंग
बनवतो. पतंगाचा कागद धाग्याने
सुत्तर कसा बांधतो, कन्ना कसा
बांधतो, याचे निरीक्षण करून
सुरेश पुढे उत्तम प्रकारची
पतंग तयार करू लागला.
पतंगासाठी लागणारा मांजा
सुरेश व त्याचे मित्र घरीच
तयार करीत. त्या काळात
सोडावॉटरच्या बाटल्या या
गोटीच्या असायच्या.
याच्यातील सोडावॉटर
काढण्यासाठी ती गोटी आत
ढकलावी लागत असे. ही गोटी आत
जाताना फीस्सऽऽ असा आवाज
यायचा. सोडावॉटर बाटलीचं बुड
फार जड असायचे. अशा फुटलेल्या
बाटल्या सुरेश 'फेमस सोडा
फॅक्टरी'च्या
इस्माइलभाईकडून आणत असे.
त्याला आमच्या काकाने एका
राजस्थानी राजपुताकडून
त्याला एक पोलादी तलवार भेट
दिली. या तलवारीची धार एवढी
तीक्ष्ण होती, की टांगलेल्या
दुधीभोपळ्याचे (लौकी) एका
वारातच दोन तुकडे होत असे. या
सुमारास 'प्रीझनर ऑफ झेंडा',
'थ्री मस्कीटियर्स' जेमिनीचा
'निशान' या चित्रपटातील
युरपियन प्रकारची तलवारबाजी
फार गाजली होती. तशा
पद्धतीच्या तलवारी मिळत
नसल्याने सुरेशने वेताच्या
दोन छडय़ा घेतल्या व मुठी समोर
एक पातळ लाकडाची दोन चाकं
साधारणत: सहा इंच व्यासाच्या
बसविलेल्या तलवारी तयार
करण्यात आल्यात. आता
सेवानिवृत्त झालेले आय. आय. एम.
अहमदाबादमधील प्राध्यापक
बाबा मोटे याच्याबरोबर
तलवारबाजीचा (फेन्सिंग) सराव
करीत असे. पुढे त्याने
वडिलांचे शिकारी पेशंट नवल
शाह वेलाती यांच्याकडून
'डायना' (जर्मन).२२ एअर गन आणली.
त्यावर तो सराव करू लागला.
त्याचा नेम इतका चांगला झाला,
की एखादी वस्तू टांगून, तिला
झोके दिल्यावर, त्या हलत्या
वस्तूला तो टिपत असे. त्याला
अनेक जागतिक शस्त्रांची व
युद्धांची चांगली माहिती
होती. एखाद्या विषयात आवड
निर्माण झाली तर त्या विषयाची
माहिती अगदी तळापर्यंत जाऊन
संपूर्ण समाधान होईपर्यंत
पाठपुरावा करण्याची वृत्ती
त्याच्यात पहिल्यापासूनच
होती. शब्दांची नजाकत आपल्या
रचनांमधून पकडणारे सुरेश भट
कसे 'हरफनमौला' होते हे
सांगण्यासाठी या आठवणी!
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment