Monday, January 10, 2011

शे(अ)रो शायरी, भाग-८ : कभी नेकी भी उसके जी में गर आ जाये है मुझ से : मानस६

मित्रांनो, शे(अ)रो-शायरीच्या
ह्या आठव्या भागात आपण मिर्झा
गालिब ह्यांच्या एका खूबसूरत
गझलेचा आस्वाद घेणार आहोत. ही
गझल लतादीदी आणि आशाताई ह्या
दोघींनीही गायली आहे, आणि फार
पूर्वी विविध-भारतीच्या
रंग-तरंग ह्या कार्यक्रमात
लागायची. मतला बघा, असा आहे-
*कभी नेकी भी उसके जी में गर आ
जाये है मुझ से जफ़ायें करके
अपनी याद शर्मा जाये है मुझ से *
[ १) नेकी = चांगुलपणा, दयाळूपणा
२) जफ़ाये= जफ़ाचे अनेकवचन,
अन्याय, अत्याचार, जुलुम ]
गालिब म्हणतोय की माझी
प्रेयसी, (जी माझ्याशी
'प्रेमात' कधीही प्रेमाने
वागली नाही, 'जिसने मोहब्बत
में मुझ पर सिर्फ जुर्म ढाये
है',) तिच्या मनात जर कधीकाळी,
चुकून माझ्याबद्दल
चांगुलपणाची भावना जागृत
झालीच आणि जर ती मला भेटायला
आली, तर तिला, तिने माझ्या
केलेल्या भावनिक छळवणूकीची
आठवण होऊन स्वत:चीच लाज वाटेल,
आणि ती खजील होऊन आपला चेहरा
लपवून घेईल. मित्रांनो, ह्या
शेरातील भाव-सौंदर्य हे आहे
की, गालिबची प्रेयसी
त्याच्याशी कधीही प्रीतीने,
स्नेहभावाने, आर्द्रतेने
वागत नाही, त्याला भेटायला
सुद्धा येत नाही, त्यामुळे
त्याला तिचा चेहरा सुद्धा
बघायला मिळत नाही.पण जर कधी
कर्म-धर्म संयोगाने तिच्या
मनात कविविषयी अनुकंपा,
अनुराग जागृत झालाच आणि ती
ह्याला भेटायला आलीच, तर
प्रियकराला तिने जी कठोर
वागणूक दिलीय, ती आठवून तिला
स्वत:चीच लाज वाटेल आणि ती
शरमेने तिचा चेहरा खाली
झुकवेल. म्हणजे, असे किंवा तसे;
कुठल्याही परिस्थितीत कविला
बिचाऱ्याला आपल्या
प्रेयसीच्या चेहऱ्याचे दर्शन
होणार नाहीच! *ख़ुदाया!
ज़ज़्बा-ए-दिल की मगर तासीर
उलटी है कि जितना खैंचता हूँ
और खिंचता जाये है मुझ से* [ १)
ज़ज़्बा-ए-दिल = हृदयाचे
आकर्षण, २) तासीर=परिणाम,
प्रभाव ३) मगर = परंतु, कदाचित
ह्या दोन्ही अर्थाने ४) खैंचता
हूँ = आपल्या बाजूला ओढतो आहे,
ह्या अर्थाने ५) खिंचता जाये
है = माझ्यापासून दूर जाते आहे,
ह्या अर्थाने ] गालिबने ह्या
शेरात शब्दांचा खूप छान खेळ
केलाय. तो म्हणतो की, हे ईश्वरा,
माझ्या हृदयात
प्रेयसीबद्दलचे जे आकर्षण
आहे, त्याचा परिणाम कदाचित
उलटाच होतो आहे की काय कोण
जाणे? कारण मी जेव्हढा तिला
माझ्याकडे आकर्षित करायचा
प्रयत्न करतोय, तेव्हढीच ती
माझ्यापासून, का कुणास ठाऊक,
आपोआपच दूर जातेय. देवा, हे असे
अघटित कसे घडतेय? ह्याला काय
म्हणावे? खरे तर माझी प्रेयसी
माझ्या मनातील,
तिच्याबद्दलच्या आकर्षणाने,
त्यातील भावनांच्या
प्रभावाने, माझ्याकडे आकृष्ट
व्हायला हवी होती, पण
प्रत्यक्षात मात्र नेमके
ह्याच्या अगदी उलटे घडतेय.
माझ्या मनातील भावनांचा हा
असा कसा, उलटाच प्रभाव आहे?
ह्या शेरातील खुबी म्हणजे
कविने 'खैचना' हे क्रियापद
दोन अर्थाने वापरले आहे, जसे
आधी , 'खैंचता हूँ' = आपल्या
बाजूला ओढतो आहे, ह्या अर्थाने
आणि नंतर 'खिंचता जाये है' =
माझ्यापासून दूर जाते आहे,
ह्या अर्थाने. 'मगर' हा शब्द
देखील 'परंतु' ह्या प्रचलित
अर्थापेक्षा 'कदाचित' ह्या
अर्थाने गालिबने वापरला आहे.
*वो बद-ख़ू और मेरी
दास्तान-ए-इश्क़ तूलानी इबारत
मुख़्तसर क़ासिद भी घबरा जाये
है मुझ से* [ १) बद-ख़ू = वाईट
स्वभावची, शीघ्र-कोपी, २)
दास्तान-ए-इश्क़= प्रेम-कथा, ३)
तूलानी= लांब-लचक, ४) इबारत=
वक्तव्य, ५) मुख़्तसर=
संक्षिप्त, ६) इबारत मुख़्तसर =
एखादी लांबलचक कथा थोडक्यात
सांगणे, ह्या अर्थाने, ७) क़ासिद=
संदेश-वाहक, दूत ] गालिब येथे
मोठ्या भावनिक अडचणीत सापडला
आहे. असे झाले आहे की, त्याला
त्याच्या प्रेयसीला संदेश
पाठवायचा आहे, आणि त्यात
त्याला खूप काही सांगायचे आहे,
खूप काही व्यक्त करायचे
आहे,इतके की, ते कमी शब्दात
व्यक्त करणे गालिबला शक्य
नाही. गालिब बोलतच सुटलाय! आणि
हे इतके लांब-लचक कथन ऐकून, जो
संदेश देणारा आहे, तो आधीच
गारठून गेला आहे, तो ह्या
विवंचनेत पडलाय की, अरे बाप रे,
इतके मोठे कथन थोडक्यात कसे
सांगायचे? आणि त्याच्यात कहर
म्हणजे गालिबची प्रेयसी आहे
शीघ्र-कोपी स्वभावाची,आणि हे
बहुदा त्या दूताला देखील ठाऊक
आहे, म्हणूनच दूत अधिकच
चिंतातुर झालाय. म्हणून गालिब
म्हणतोय की माझे हे इतके दीर्घ
कथन ऐकून जर हा दूतच, हे सगळे
थोडक्यात कसे सांगायचे, ह्या
विचाराने इतका चिंताग्रस्त
आहे, तर मग माझी प्रेयसी, जी
अतिशय शीघ्र-कोपी स्वभावाची
आहे, तिची प्रतिक्रिया हे
पुराण ऐकून काय होईल ह्याची
कल्पनाच केलेली बरी! ती तर हे
पाल्हाळ ऐकून, वैतागून
संतापाचा कहरच करेल. पण एका
बाजूला अशी समस्या आहे की मला
जे सांगायचे आहे ते थोडक्यात
सांगताच येऊ शकत नाही, आता मी
काय करावे? *उधर वो बदगुमानी है,
इधर ये नातवानी है ना पूछा
जाये है उससे, न बोला जाये है
मुझ से* [ १) बदगुमानी= मनातील
संशयाची भावना, २) नातवानी =
शारिरीक क्षीणता.] प्रसंग असा
आहे की प्रेयसीच्या दीर्घ
वियोगाने आणि त्यामुळे
झालेल्या मानसिक यातनांनी
कविची शारिरीक अवस्था सुद्धा
अतिशय क्षीण झाली आहे, आणि
अश्यातच त्याची प्रेयसी
त्याला भेटायला आली आहे, परंतु
गंमत अशी आहे की प्रेयसीचा
ह्या गोष्टीवर अजिबात
विश्वास नाहीय की कविचे
तिच्यावर खरोखरीच प्रेम आहे
म्हणून. तिच्या मनात कविविषयी
संशयाचीच भावना अधिक आहे.
प्रेयसी भेटायला आल्यामुळे,
कविला बोलायचे तर खूप भरभरून
आहे, पण त्याची अवस्था इतकी
क्षीण आहे की तो एक शब्दही
बोलू शकत नाही. दुसरीकडॆ
प्रेयसीचा समज हा आहे की कविला
तिच्याबद्दल अजिबात प्रेम
वाटत नाही, त्याला तिची अजिबात
पर्वा नाहीय, म्हणूनच हा मूग
गिळून गप्प बसलाय! म्हणून ती
सुद्धा त्याच्या
प्रकृतीविषयी चौकशी करणारा
एक चकार शब्द सुद्धा काढत
नाही. तिने जणू तोंडाला कुलुपच
लावले आहे! खरे तर तिला असेच
वाटत असते, की ह्याच्या मनात
माझ्याविषयी काही भावना
शिल्लक असतील, तरच हा बोलेल ना!
हा तोंडातून चकार शब्द देखील
काढत नाहीय,मग मी तरी कशाला
बोलू? पण वस्तुस्थिती.. !?
...ह्याच्या अगदी उलट आहे.
बिचारा कवि! तो तर त्याच्या
अशक्तपणामुळे बोलू शकत नाहीय.
म्हणून गालिब म्हणतोय की- "ना
पूछा जाये है उससे, न बोला जाये
है मुझ से" *सँभलने दे मुझे ऐ
नाउम्मीदी, क्या क़यामत है कि
दामन-ए-ख़याल-ए-यार छूटा जाये
है मुझ से * [ १) नाउम्मीदी= मनाची
हतबल,हताश अवस्था २) क़यामत=
प्रलय; इथे, काय आफत आहे बुवा,
कठीण आहे बुवा, अश्या काहीश्या
अर्थाने, ३) दामान=दामन= इथे पदर
ह्या अर्थाने, ४)
खयाल-ए-यार=प्रेयसीबद्दलचा
विचार ] कवि म्हणतोय की माझे मन
नैराश्याने संपूर्णपणे
ग्रासून गेलेय. मनाच्या ह्या
अवस्थेला उद्देशूनच कवि
म्हणतोय की, हे नैराश्या, मला
असे खाईत लोटू नकोस! अरे, आज काय
प्रलयाचा दिवस आहे की काय?
माझ्या मनाला थोडॆ सावरू दे!
(इथे गालिबने
प्रेयसीबद्दलच्या विचाराला
जणू एका स्त्रीचीच उपमा देऊन
मनाच्या अत्यंत नैराश्यपूर्ण
अवस्थेचे अगदी यथार्थ वर्णन
केलेय.) तो नैराश्याला
उद्देशून म्हणतोय की
तुझ्यामुळे, प्रेयसीबद्दलचा
विचाररूपी जो पदर आहे, तो ही
माझ्या हातातून निसटून
चाललाय..... असे म्हणतात की
एखादी व्यक्ती जेंव्हा एखादी
इच्छित वस्तू किंवा व्यक्ती
आपल्याला प्राप्त होणार नाही
ह्या भावनेने निराश होते,
तेंव्हा त्या व्यक्ती किंवा
वस्तूबद्दलचा विचार हळू-हळू
तिला सोडून जायला लागतो. पण
प्रियकराला मात्र
प्रेयसीबद्दलचा विचार इतका
जिवापाड प्रिय आहे की तो
त्याला कधीच सोडून जाऊ नये असे
त्याला वाटते. म्हणून त्याचे
मन हा विचार घट्ट धरून ठेवायचा
प्रयत्न करते आहे, पण मनाची
हतबलता इतकी अधिक आहे की ह्या
विचाराचे शेवटचे टोक, म्हणजे
पदर सुद्धा, अगदी निकराचा
प्रयत्न करून देखील, त्याच्या
हातातून निसटून जातोय. म्हणून
मनाच्या ह्या अवस्थेला गालिब
जणू अतिशय अजीजीने , कळवळून
म्हणतोय की, हे बघ,
तिच्याबद्दलच्या विचारांचा
पदर सुद्धा माझ्या हातातून
निसटून चाललाय;.. मला इतके पण
निराश नको करूस, नैराश्या!
*क़यामत है कि होवे मुद्दई का
हमसफ़र "ग़ालिब" वो काफ़िर जो
ख़ुदा को भी न सौंपा जाये है
मुझ से * [१) क़यामत = प्रलय,
जगबुडीचा दिवस, २) मुद्दई=
प्रतिस्पर्धी, शत्रु ३)
हमसफ़र= प्रवासातील सोबती ४)
काफिर = येथील संदर्भात अर्थ
'प्रेमिका' ] गालिबच्या काळात
एक रिवाज होता; असे म्हणायचे
की, कुणी जर प्रवासाला जाताना
आपला निरोप घ्यायला आले तर
त्याला, ' जाओ, मै तुम्हे खुदा
को सौंपता हूँ, खुदा तुम्हारी
हिफाज़त करे' असे म्हटल्या
जायचे. आता इथे प्रसंग असा आहे
की गालिबची प्रेमिकाच,
जिच्यावर त्याचे जिवापाड
प्रेम आहे, ती त्याच्याच
शत्रुची सोबती होऊन, बहुदा
जीवनाच्या प्रवासातच त्याची
साथ द्यायला निघाली आहे आणि
कविचा निरोप घ्यायला आली आहे.
म्हणून गालिब म्हणतोय की, हे
ईश्वरा, हा तर माझ्यासाठी जणू
प्रलयाचाच दिवस आहे. माझे
जिच्यावर इतके निस्सीम प्रेम
आहे, ती इतर दुसऱ्या कुणाचीही
झालेली मी कसे काय बघू शकणार
आहे?कधीच नाही! अगदी खुद्द
परमेश्वराची सुद्धा! आणि
म्हणूनच नेहमीच्या
रिवाजाप्रमाणे मी तिला "जाओ,
मै तुम्हे खुदा को सौंपता हूँ"
असे ही म्हणू शकत नाही,कारण
तिच्या बाबतीत मी इतका
'पझेसिव्ह' आहे की तिला मी
परमेश्वराच्यासुद्धा हवाली
करू शकत नाही.आणि ही तर खुद्द
माझ्या शत्रुचीच सह-प्रवासी
व्हायला निघाली आहे! आहे ना
उत्तुंग कल्पना-विलास?! चला तर,
बाय! पुढील भागात भेटूच. -मानस६
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment