माझे किती क्षण राहिले.. (*येथे
ऐका, येथे अनुभवा!)* [1] दूर
कुठेतरी आमिरखासाहेब मारवा
आळवताहेत.. दूर कुठेतरी सुरेश
भट मारवा उलगडून सांगताहेत..!
'माझे किती क्षण राहिले.. ' हा
सुरेश भटांचा मारवा केवळ
शब्दातीत आहे, अप्रतिम आहे! ते
लोक होते वेगळे घाईत जे गेले
पुढे मी मात्र थांबून पाहतो
मागे कितीजण राहिले.! स्वरांचं
बॅलन्सिंग, स्वरांचं बेअरिंग
जबरदस्त! अचूक स्वर लागले
आहेत, नेमके लागले आहेत..!
भटसाहेबांचा हा मारवा ऐकताना
त्यांनी गाण्याची कुठे रीतसर
तालीम घेतली आहे की काय, असं
वाटतं अशी विलक्षण एकतानता,
एकाग्रता..! सारं राज्य
शब्दांचं, सारा अंमल
सुरालयीचा! भटसाहेबांचा कोमल
रिषभ अंगावर येतो! होता न साधा
एवढा जो शब्द मी तुला दिला
एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण
राहिले.. मारव्याच्या
सुरावटीकरताच केवळ हे शब्द
जन्माला आले.. आणि म्हणूनच
भटसाहेबांनी हे शब्द
मारव्यात गुंफले.. हे विलक्षण
अद्वैत आहे.. शब्दांचं आणि
मारव्याच्या सुरांचं!
गझल-गायकी म्हणजे काय ते इथे
कळतं.. हो, गायकीच ही.. हे फुटकळ
गझल वाचन नव्हे.. आज मराठी
गझलांच्या
वाचनाचे/सादरीकरणाचे अनेक
कार्यक्रम होतात.. या सगळ्या
नवख्यांनी शिकावं की गझल कशी
वाचावी, कशी मांडावी.! पण त्या
करता जाण असावी लागते
स्वरांची. स्वर जगावे लागतात,
अनुभवावे लागतात! त्याशिवाय
मुशायरा-गायकीची पेशकारी येत
नाही! ह्या गझल गायकीला ताल
नाही की ठेका नाही, परंतु लय
कशी घट्ट पकडली आहे ते पाहा.. एक
अदृश्य लय! लय- शब्दसुरांचा
श्वासोश्वास! उदाहरणार्थ -
एकाच शब्दाला उभे, आयुष्य तारण
राहिले! 'उभे' शब्दानंतरचा
लयदार पॉज.. "ष्य' अक्षरावरचा
लयदार आधात.. आणि 'ष्य' - 'तारण'
वरचा म'गरेसा चा मारव्यातला
भन्नाट अवरोह..! याला म्हणतात
गाणं, याला म्हणतात लय, याला
म्हणतात गायकी! हे केवळ
गझल-गायन वा वाचन नव्हे, हा तर
मारव्याचा भन्नाट जमलेला
विलंबित ख्याल! भटांची हा
मारवा अन् त्याची गायकी भिनते
सिस्टिममध्ये! काळवंडलेलं
आकाश.. तीन सांजा झालेल्या..
भयाण तीन सांजा आणि अंगावर
सरसरून येणारी कातरवेळ..! हा
मारवा नाही, हे स्वगत आहे..
भटसाहेबांचं स्वगत! 'मागे
कितीजण राहिले हा हिशेब मागतो
आहे हा मारवा! पण हिशेब द्या
किंवा नका देऊ.. दुनियेला
फाट्यावर मारतो हा मारवा आणि
म्हणतो.. ओसाड माझे घर मुळी
नाही बघायासारखे हे आसवांचे
तेवढे तोरण अद्याप राहिले..!
गेंद्याच्या फुलांचं तोरण
काय, कुणीही बांधतो हो.. पण
आसवांचं तोरण केवळ भटसाहेबच
बांधू शकतात, त्यांच्या
मारव्याचे सूर हीच त्या
तोरणाची पानं-फुलं! आकाशातले
सारे ग्रह उच्चीचे होतात आणि
सुरेश भटांसारखा एक अवलिया
गझल लिहून जातो, मारवा गाऊन
जातो..! -- तात्या अभ्यंकर.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2185
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment